Ad will apear here
Next
कुरवपूरच्या प्रवासाची गोष्ट...
श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कुरवपूर येथे जाण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विचार चालू होता. तसे संकेतही मिळत होते. आणि योग आला. मित्र अवधूत तोळबंदे याने विचारले, की कुरवपूरला जायचे का? हो-नाही म्हणत, जायचे नक्की झाले. मी, दीपक कुलकर्णी आणि अवधूत नावाचा एक मित्र, असे आम्ही तिघे संध्याकाळी बसव एक्स्प्रेसने निघालो आणि थेट कर्नाटकातील रायचूर जिल्हा केंद्र गाठले.

लॉजवर थांबण्याबाबत दीपक आग्रही होता. कारण मागच्या वेळी दीपक आणि अवधूत आले होते, तेव्हा स्टेशनवर थंडीचा त्रास अधिक सहन करावा लागला होता. या वेळीही लॉजवर किंवा स्टेशनवर न थांबता रायचूर शहरातून चालत आम्ही बस स्थानकामध्ये गेलो. तिथे रात्री तीन ते पाच असे साधारण दोन तास झोपून उठल्यावर आम्ही इडलीचा गाडा शोधायला बाहेर पडलो. कारण भूकच तेवढी लागलेली.

बस स्थानकाच्या बाहेरच एका गाड्यावर गरमागरम मेदू वडे तळतानाचे आणि इडलीचे कुकर दिसले, तसा आमचा मोर्चा तिकडे वळला आणि अप्रतिम इडलीवर ताव मारून सकाळी सात वाजता येणाऱ्या अतकुर/कुरवपूरच्या बसची वाट पहात बसलो. हवेतील गारवा आणि मला नेहमी जाणवणारा कर्नाटकच्या मातीत दरवळणारा सुगंध मोहून टाकत होता.

बस आली, चालकाच्या मागेच असलेल्या बाकावर आम्ही बसलो. तिकीट काढायला सुरुवात होत नाही, तेवढ्यात कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी अशा सर्व भाषांची भेळ बनवून आमचे अवधूत मास्तर बसचालक आणि वाहकासोबत गप्पा मारू लागले आणि मी निद्रादेवतेला शरण जाऊन झोपी गेलो. जाग आली तेव्हा पाहतो तर शहरातील चकाचक सडकेवर धावणारी बस भाताच्या शेतातून निघाली होती. सर्वत्र भातशेतीच. थंडीचे दिवस असल्याने हवेत हलकेसे धुक्याचे साम्राज्य होतेच. त्यातही उंच उंच झाडे, सर्वत्र पाण्यानी भरलेली आणि नुकतीच पेरणी झालेली, काही ठिकाणी भात लावणी सुरू असलेली शेती दिसू लागली. मन प्रसन्न झाले. आपण वेगळ्या जगात आल्याचा भास झाला. कारण भातशेती एवढ्या प्रमाणात कधी पाहिलीच नव्हती.

बस अतकूर गावी आली आणि आमच्या चक्रधराला (ड्रायव्हर) भूक लागली. गाडीला बाजूला लावून ते अल्पोपाहार करायला निघूनही गेले. बसमध्ये आम्ही अवघी सहा ते सात माणसे, तीही सर्व मराठी. मग काय, कुठून आलात, कसे आलात, चर्चा झाली, तरी आमचे चक्रधर येईनात. मी चहाप्रेमी. बसमधून उतरलो, तर समोर देवीचे मंदिर, मंदिरा समोर भले मोठे दगडी चाक असलेले दोन मोठे रथ पाहून हात आपोआपच जोडले गेले. भातशेतीला लागून असलेल्या टपरीकडे गेलो आणि अद्रक टाकून बनवलेला कडक चहा घेत शेताच्या बांधावर निसर्ग पाहू लागलो. आहाहा... काय तो निसर्ग...

बसचालक येण्याची चिन्हे काही दिसेनात, असे पाहून दीपकने त्यांना शोधून आणले आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच बस कृष्णेकाठी पोहोचली. प्रचंड विस्तीर्ण पात्र आणि महाकाय दगडांनी भरलेली कृष्णा संथ गतीने वाहत होती. एक भली मोठी टोपली, तिच्या तळाला ताडपत्री आणि डांबर लावून त्यात पाणी शिरणार नाही याची काळजी घेऊन बनवलेली बांबूची बुट्टी, तिचा वापर जहाजाप्रमाणे केला जातो, हे इथे सर्रास पाहायला मिळत होते. त्या बुट्टीत नऊ ते १० जण सहज बसून अर्ध्या तासाने आम्ही कुरगड्डी म्हणजेच कुरवपूरच्या बेटावर पोहोचलो.



बेटावर साधारण एक-दीड किलोमीटर पायपीट करून गेले, की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या मंदिराचे दर्शन होते. कर्नाटक आणि तेलंगणच्या सरहद्दीवर असलेल्या कृष्णेच्या प्रवाहाला छेदून वर आलेले कुरुगड्डी हे बेट दत्त संप्रदायातील पहिले अवतारपुरुष श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी आहे. याची महती प्रचंड आहे. दत्त संप्रदायातील अनेक महत्त्वाची ठिकाणे टेंब्ये स्वामींनी शोधून काढली. याही तपोभूमीचा शोध स्वामींनीच घेतला. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा सिद्धमंत्र इथेच प्रसवला. १४ वर्षे सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभांनी येथे तप केले. या स्थानाबद्दलची महती श्री गुरुचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आहे. त्याबद्दल अधिक लिहीत नाही.

सकाळी साधारण नऊ वाजता गोपुरातून मंदिरात प्रवेश केला. मंदिराची नित्य पूजा-सेवा करणारे श्री. भट्ट पुजारी यांच्या घरासमोरील जुन्या दगडी सभामंडपात आम्ही सामान ठेवले आणि नदीवर स्नान करण्यास निघालो. मंदिराच्या चहू बाजूंनी दगडी सभामंडप आहे. त्याचाच वापर घर आणि भोजन कक्ष म्हणून किंवा आलेल्या भक्तांच्या निवासासाठी म्हणून केला जातो. बेट उतरत तेलंगणच्या बाजूने असलेल्या कृष्णामाईत स्नान करून सोवळे नेसून आम्ही मंदिरातील गर्भगुडीमध्ये (गर्भागृह) प्रवेशलो. (गर्भागृहात पुरुषांना धोतर-पंचा याच वस्त्रात प्रवेश बंधनकारक आहे. त्याला सोवळेही म्हटले जाते).

ग्रॅनाइटच्या मोठमोठ्या दगडांनी बनवलेल्या पुरातन मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. गर्भागृहात उजव्या बाजूला पाहिले, की श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन होते. मन प्रसन्न करणारी शांतता, अष्टगंधाचा दरवळणारा सुगंध यामुळे साऱ्या दुःखांचा विसर होतो आणि माणूस देवाला आपोआप शरण जातो. स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ इथे कायम विराजमान असतात. त्यांच्या पादुकांचे नित्य पूजन इथे होते. अवधूतच्या घरून आणलेला नैवेद्य पुजाऱ्यांच्या हातात देण्यात आला. त्यांनी आरती करून नैवेद्य दाखवला आणि येथे आल्याचे सार्थक झाले. नैवेद्याचा प्रसाद सर्वांना देऊन कानावर पडत असलेले गुरुचरित्र पारायण ऐकत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून मनोभावे नमन करून मंदिराच्या बाहेर पडलो.

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तप केलेल्या वटवृक्षाच्या सान्निध्यात काही वेळ घालवून टेंब्ये स्वामींनी चतुर्थाश्रमात ज्या गुहेत चातुर्मास केला त्या गुहेत जाऊन आलो. प्रचंड अंधारात समोरील काहीच काहीच दिसत नसतानाही समोर साक्षात शिव विराजमान आहेत असा भास व्हावा आणि एक क्षण नागराज असल्याचा भास होऊन जीव घाबरला. पुढच्याच क्षणी ‘देव आहे भिण्याचे काय कारण’ असे म्हणत हात जोडले जावे आणि तिथल्याच एका साधकाच्या मोबाइल बॅटरीने समोर पाहावे तर खरेच शिवलिंगाचे दर्शन व्हावे हे गुरुकृपाच. दासोहातील लोणचे-भात-सांबार प्रसाद घेऊन पुन्हा बुट्टीतून कृष्णामाई ओलांडून आम्ही तेलंगणमधील मकतल-रायचूरमार्गे साक्षात ईश्वर दर्शन, अनेक आशीर्वाद आणि अनुभूती घेऊन सोलापूरला परत निघालो.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

- चन्नवीर गुंडप्पा बंकुर, सोलापूर

(कुरवपूर कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यात आहे. त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZTICI
Similar Posts
तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय स्थापत्यशास्त्र! तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील १००० वर्षांपूर्वी, चोला राजवटीत, साधारण २०-२५ वर्षांत बांधून पूर्ण केलेले बृहदीश्वर मंदिर हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अचंबित करणारा नमुना आहे!
Faith always moves me Particularly the simple, unshakeable faith that so many people in India have in their Gods. In my solo travels in India, I have met some remarkable people who have pursued dharma with a conviction that acts like a lodestar for them as they navigate their life’s journey across the sea of samsara. As you
सत् श्री अकाल!! अमृतसर म्हणजे अमृताचं सरोवर अन् त्यात उभं असलेलं हे सुवर्ण मंदिर उर्फ हरमंदिर साहिब. ‘हरमंदिर’ म्हणजे सर्वांच्या ईश्वराचं राहण्याचं ठिकाण! शिखांचं प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या ह्या मंदिरात सर्व जात-धर्माच्या व्यक्तींना मुक्त प्रवेश असतो. इथे येताना आपले पाय धुवून आणि डोकं झाकून यावं एवढंच बंधनकारक असतं
गिरनार परिक्रमा : एक स्वानुभव चिंतन - कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांची मुलाखत गिरनारच्या परिक्रमेबद्दल लोकांच्या मनात बरंच कुतुहल असतं. ते कुतुहल शमवण्यासाठी कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांची धनश्री नानिवडेकर यांनी घेतलेली ही मुलाखत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language